येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत नव्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे देशभरात सध्या राममय वातावरण आहे. याचनिमित्ताने प्रभू श्रीरामांच्या विविध गुणवैशिष्ट्यांविषयी चर्चा केली जात आहे. मात्र, मर्यादा पुरुषोत्तम हे निसर्गस्नेही होते. रामराज्याची कल्पना रामाला निसर्गाच्या सहवासात १४ वर्षे वनवासामध्ये आणि काही वर्षे वशिष्ठ ऋषींच्या आश्रमातील गुरुकुलात राहूनच मिळाली असली पाहिजे.
राजकारण आणि धर्मकारण या धुमश्चक्रीमध्ये प्रभू श्रीरामाने निसर्ग एकनिष्ठ राहून जो आदर्श निर्माण केला त्याला आपण विसरता कामा नये. रामचंद्रांना कितीतरी गुणविशेषणे लावली गेली आहेत. मला त्यात एक विशेष लावावेसे वाटते ते म्हणजे निसर्गश्रेष्ठ श्री राम.
प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र, त्यांची जीवनशैली, त्यांचे विचार आणि आचरण हे सारे पाहिले की आपल्याला लक्षात येते की, ते सारे निसर्गाशी निगडीत आहे. श्रीरामांनी लहानपणीच गुरु वशिष्ठांकडून शिक्षण घेतले. गुरु वशिष्ठांचा आश्रम हा जंगलातच होता. त्यामुळे श्रीरामांनी त्यांच्या बंधूंसह वशिष्ठ ऋषींच्या जंगलातील आश्रमातच सर्व धडे घेतले. त्याकाळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. म्हणजे, गुरुसोबत राहून शिक्षण घेणे. वशिष्ठ ऋषी हे शिष्यांना जंगलात, तळ्याकाठी, आश्रमात किंवा विविध ठिकाणी घेऊन जात. त्यांना निसर्गाविषयी आणि निसर्गातील घटकांविषयी विस्तृतपणे मार्गदर्शन करीत. मग, त्यात जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र यासह विविध विषयांचा अंतर्भाव असे. आपल्याला भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर आपल्याला निसर्गात आणि निसर्गाच्या साथीनेच जीवन जगावे लागेल, असा कानमंत्र वशिष्ठ ऋषींनी दिला. त्यामुळेच प्रभूश्रीरामांची जीवनशैलीही पर्यावरणपूरकच होती. वानरसेनेचे व वानरभक्तीचे महत्व रामांनी निसर्गतःच ओळखले. निसर्गातील औषधी वनस्पतींची श्रीरामांना जाणीव होती. शबरीची बोरे रामाला आवडली कारण शबरीचे प्रेम आणि निसर्गाने भरभरुन दिलेली भेट.
रामचंद्रांनी वनवासात १४ वर्षे जंगलातच व्यतीत केली. म्हणजेच, ऋषी वशिष्ठ यांच्या आश्रमातील वास्तव्य, पुढे ऋषी विश्वामित्रांनी दिलेले धनुर्विद्या आणि शास्त्र विद्येचे शिक्षण आणि १४ वर्षे वनवास. असा जवळपास दोन दशकांचा कालावधी श्रीरामांनी जंगलात म्हणजेच निसर्गातच घालविला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निसर्गाचे अनेकानेक संस्कार झाले. निसर्ग आपल्याला जे भरभरुन देतो, त्याचे रक्षण करणे आणि त्याच्यासोबतच राहून आपला उत्कर्ष साधणे हे त्यांना कळून चुकले होते. निसर्गाची हानी होईल, अशी कुठलीही कृती ते करत नसत.
पुरुषोत्तमांना निश्चितच वाटले असले पाहिजे की कैकेयीने वनवासात पाठविले ही एक संधीच आहे. निसर्गावर जगण्यापेक्षा निसर्गाशी एकनिष्ठ राहूनच सर्वांसाठी शाश्वत राज्य निर्माण करता येईल. अयोध्येत परतल्यानंतर श्रीरामांनी राज्य कारभार सुरू केला. आणि अल्पावधीतच तो अतिशय लोकप्रिय आणि लोककल्याणकारी ठरला. तेच हे राम राज्य. अगदी तळागाळातील समाजाला देखील त्यांनी दुर्लक्षिले नाही. निसर्गात मोठे वृक्ष असतात आणि वृक्षवेली पण असतात. झुडपे आणि गवत पण. फुले असतात आणि काटे सुद्धा. सगळ्यांची काळजी घेऊन त्यांच्या प्रकृतीचा उपयोग करुन शाश्वत विकास म्हणजेच रामराज्य.
Leave a Reply