डॉ. राजेंद्र शेंडे
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिन्दुस्थानचेच कुलदैवत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी होते. मात्र, यंदा ईशान्येतील गुवाहाटीत तिचा विशेष उत्साह दिसला. तोही आयआयटी सारख्या प्रतिष्ठीत संस्थेमध्ये. विशेष म्हणजे, तेथील या समारंभाचा मी साक्षीदार होतो. माझ्यासाठी ही घटना जितकी सुखावह आणि अभिमानास्पद तशीच आश्चर्यजनकही ठरली. कारण…
मी स्थापन केलेल्या ग्रीन तेर फाऊंडेशनने नेट झिरो (हवामान बदलाच्या आव्हानाला कार्बन न्यूट्रल म्हणजेच नेट झिरो ने सामोरे जाता येणार आहे) ही मोहिम हाती घेतली आहे हे आपणास ठाऊक आहेच. याच मोहिमेतील तीन कार्यशाळा संपन्न झाल्या. त्यातील पश्चिम भारताची कार्यशाळा पुणे, दक्षिण भारतातील चेन्नई आणि उत्तर भारतातील दिल्लीत झाली. या मोहिमेला तरुणांचा मिळणारा प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे. याच कार्यशाळेतील चौथी मालिका ईशान्य भारतातील गुवाहाटीमध्ये झाली. या कार्यशाळेप्रसंगी एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे शिवजयंती समारंभाची.
मुंबई आयआयटीचा मी माजी विद्यार्थी. केमिकल इंजिनिअरींगची पदवी मी घेतली आहे. त्यामुळे सहाजिकच आयआयटी आणि माझे ऋणानुबंध जुने आहेत. गुवाहाटीच्या आयआयटीमध्ये जाताना आणि तेथे वावरताना मला अधिक सुखावह वाटत होते. कार्यशाळा २० फेब्रुवारी रोजी असली तरी मी १८ फेब्रुवारी रोजीच गुवाहाटीच्या आयआयटी कॅम्पसमध्ये दाखल झालो. सोमवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेची पूर्वतयारी, मान्यवरांच्या उपस्थितीची खात्री, आयआयटीच्या संचालकांसह तेथील प्राध्यापक आणि तज्ज्ञांच्या भेटी असा भरगच्च कार्यक्रम होता. त्यामुळे मी अतिशय व्यस्त होतो.
तेवढ्यात माझ्यासमोर एक विद्यार्थी आला. तो म्हणाला, ‘सर, शिवजयंतीच्या समारंभासाठी आपण यावे.’ हे ऐकून मला सुखद धक्काच बसला. हा विद्यार्थी होता पियुष गुळवे. तो मुळचा नाशिकचा. गुवाहाटीत तो केमिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. शिवाय तेथील जिमखान्याचा तो उपाध्यक्ष. त्याच्या पुढाकारानेच तेथे शिवजयंती साजरी होत होती. छत्रपती शिवराय हे सर्वांचेच आदर्श आहेत. त्यांची जयंती गुवाहाटी आयआयटीमध्ये साजरी होत आहे आणि त्याचे निमंत्रण मला मिळते आहे, यामुळे मला खुपच आनंद झाला. त्यानंतर आम्ही शिवजयंती समारंभासाठी जिमखाना हॉलमध्ये गेलो. तेथे छत्रपतींच्या प्रतिमेला आम्ही पुष्पहार अर्पण केला. आयआयटी गुवाहाटीचे डीन अचलकुमार व उपकुलसचिव गुणमणी दास हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. आम्ही सर्वांनीच छत्रपती शिवरायांच्या आठवणींना उजाळा दिला. अखेर ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी गुवाहाटी आयआयटीचा परिसर दुमदुमून गेला.
शिवराय हे काही महाराष्ट्रासाठीच आदर्श नाहीत. त्यांचे कार्यकर्तृत्व हे चौफेर लख्ख आहे. त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामुळेच गुलामगिरीचे जोखड झुगारणे शक्य झाले. त्यानंतर अनेक पिढ्या अभिमानाने जगत आहेत. चैतन्य, दूरदृष्टी, आपुलकी आणि जिव्हाळ्याने महाराजांनी अनेकांना आपलेसे केले. त्यांचे विचार आणि आचरण आजही आपल्याला प्रेरणा देते. विशेष म्हणजे शिवाजी महाराज हे पर्यावरणाच्या प्रती अतिशय सजग होते. महाराजांच्या या पैलूची फारशी माहिती अनेकांना नाही. जल नियोजनापासून ते पर्यावरण स्नेही कृतीबाबत ते आग्रही होते. म्हणूनच आपण महाराजांच्या काळातील कुठलेही दुर्ग पाहतो तेथे उत्कृष्ट जलनियोजन आपल्याला दिसते. दुष्काळातही पाण्याचे काटकासरीने नियोजन कसे करायचे, वापर करायचा याचे अनेक दाखले पुस्तकांमधून आपल्याला सापडतात.
शेती ही हवामान आधारीत आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही शेतीचा पुरस्कार छत्रपतींनी केला. पर्यावरण संरक्षणासाठी रिसायकल, रिड्यूस आणि रियूज विषयी आपण आज बोलतो. पण, गडावरील कचऱ्याचा निचरा कसा आणि किती करावा हे महाराजांनी आपल्या विचार आणि कृतीतून दाखविले आहे. वनसंवर्धनाच्या बाबतीतही ते सजग होते. म्हणूनच आपल्या मावळ्यांकडून कुठेही निसर्गाची वा पर्यावरणाची नासधूस होणार नाही, याची काळजी ते घेत असत. त्यासाठीच त्यांनी अमात्यांना लिहिलेली पत्रे, हस्तलिखिते तपासली की आपल्याला कळून चुकते की, महाराजांना किती दूरदृष्टी होती.
कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रात कुठेही आपल्या वास्तव्यामुळे किंवा मोहिमेमुळे वनांचे नुकसान होणार नाही, वणवे लागणार नाहीत, याची काळजी घेण्याचे सूचना वजा आदेश ते देत असत. महाराजांचा गनिमी कावा हा प्रामुख्याने पश्चिम घाटातील झाडा-झुडपांमध्ये आणि घनदाट जंगलांमध्येच सुरू असे. त्यामुळे वने राहिली तरच आपल्या लढायासुद्धा यशस्वी होतील, याची खात्री त्यांना होती. वनांमध्ये वावरताना कुठलीही नासधूस किंवा हानी होणार नाही, याची विशेष खबरदारी ते घेत.
सिंधुदुर्ग या जलदुर्गाची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. सागरी आरमारासाठी लागणारी लाकडे ही फळझाडांपासून न करता लागेल तेवढ्याच सागवानाची वापरावी अशा सूचना केल्या. सागरी बंदर, गड यांच्या रचनेपासून बांधकामापर्यंत महाराजांनी अतिशय जातीने लक्ष दिले. म्हणूनच खाऱ्या पाण्याने वेढलेल्या किल्ल्यात आज गोड्या पाण्याच्या विहीरी आढळतात. हे कसे शक्य आहे, याचे कोडे अद्यापही अनेकांना उलगडलेले नाही. सागरी मोहिम आखताना किंवा प्रत्यक्ष राबविताना किनारपट्टीवरील खारफुटीसह अन्य वनांची हानी होणार नाही, याची काळजी ते घेत असत. नद्या, तळी आणि जलस्त्रोत स्वच्छ ठेवावेत, त्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी ते विविध सूचना करीत. त्याचे पालन होते आहे की नाही, याचीही खातरजमा करीत. पर्यावरण क्षेत्रात गेली अनेक दशके मी कार्यरत आहे. मात्र, छत्रपती शिवरायांसारख्या दूरदृष्टी लाभलेल्या पर्यावरण स्नेही राजाप्रती मी नेहमीच नतमस्तक होतो. गुवाहाटीत तर माझा ऊर भरुन आला. त्यासाठीच हा लेखनप्रपंच…..
Leave a Reply