लीड: प्राचीन काळापासून जंगलाला आग लागत आल्या आहेत. त्यापैकी बहुतांश आगी मानवनिर्मितच आहेत. ब्राझीलमध्ये २०१९ मध्ये अॅमेझॉनच्या जंगलात लागलेल्या आगीचे रौद्ररूप पाहता क्षणीच दिसत होते. जगभरातील माध्यमांमध्ये ही घटना मुख्य मथळा झाली होती. अॅमेझॉनच्या जंगलात तब्बल ९३ हजार वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची धग अजूनही कायम आहे. या आगीच्या धुरामुळे संपूर्ण पृथ्वीचा श्वास कोंडला गेला आहे.
माणसाची बेधडक वृत्ती
पर्यावरणापेक्षा अर्थव्यवस्था महत्त्वाची आहे असा तुम्ही विचार करत असाल, तर तुम्ही पैसे मोजताना तुमचा श्वास रोखून ठेवा, असे अमेरिकन प्राध्यापक गेय मॅकफर्सन यांनी सांगून ठेवले आहे. माणसाचा अस्त २०३० पर्यंत आल्याची कल्पना त्यांनीच मांडली आहे. माणसाकडून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा मुक्त हस्ताने वापर होत आहे. आपल्या फायद्यासाठी त्याने निसर्गाची बेधडक कत्तल केलेली आहे. या प्राणघातक आगी लागण्यासाठी माणूसच जबाबदार आहे. भांडवलशाहीची अतिशयोक्ती पृथ्वीवरील वृक्षसंपदेचे अस्तित्व संपवू पाहात नसून, तो माणसाच्याच अस्तित्वाला धोका ठरू पाहात आहे. ब्राझीलच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संशोधनानुसार, अॅमेझॉनच्या जंगलात २०१८ मध्ये लागलेल्या आगीच्या तुलनेत जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये ६० टक्क्यांपेक्षा मोठी आग लागली होती.
पृथ्वीची फुफ्फुसे
जगभरात फक्त सहा देशांमध्ये अॅमेझॉ़न वनांपेक्षा मोठे क्षेत्रे आहेत. ५५० दशलक्ष हेक्टरमध्ये दीड भारत सामावू शकतो, इतका मोठा वर्षावनांचा विस्तार आहे. अॅमेझॉनच्या जंगलांमधील आग जैवविविधतेच्या खजिन्याला मोठा धोका ठरू शकते. स्थानिक आणि आदिवासी लोक वगळले तर तेथे राहणार्या लाखो प्राणी, पक्षी, विविध प्रकारची झाडे, वेलींचा नाश होऊ शकतो. ३० दशलक्ष लोक या वर्षावनात राहतात. वनांमधील झाडे, अन्न, कपडे आणि पारंपरिक औषधांसाठी ते या जंगलांवर अवलंबून आहेत. पण अॅमेझॉन जंगलांच्या भव्यतेपेक्षाही जंगलातील विशिष्ट प्राणी आणि वनस्पती यांचे परस्पारावलंबन महत्त्वाचे आहे. हवा आणि पाणी धरून ठेवण्याच्या जमिनीच्या क्षमतेमुळे या वर्षावनांना पृथ्वीचे फुफ्फुसे असे संबोधले जाते.
संकटांना आमंत्रण
आधीपासून हवामान बदलाच्या आजाराने पृथ्वी हैराण असताना अॅमेझॉनच्या वर्षावनांमध्ये विनाशकारी आग लागणे चिंताजनक आहे. अभूतपूर्व उष्णतेच्या लाटा, महाकाय हिमनग वितळून जगात महापूराने थैमान घातलेले आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे संकट जगाने कधीच अनुभवले नाही.
कार्बन सिंक
जगभरातून उत्सर्जित होणारा जवळपास २५ टक्के कार्बन डायऑक्साईड (CO2) अॅमेझॉनमधील वर्षावने शोषून घेतात. त्याद्वारे हिरवीगार वनसंपदा मिळतेच शिवाय जमिनीचीही धूप थांबविण्यास मदत होते. त्यामुळेच जंगलांना कार्बन सिंक असे म्हटले जाते. हवामान बदल घटविण्यासाठी वृक्षसंपदा खूपच परिणामकारक आहे.
वृक्षांची कत्तल
शेती करण्यासाठी जंगलाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. विशेषतः रबर, औषधी आणि परदेशी वनस्पती, जनावरांना चारा, खाणकाम आणि फर्निचरसारख्या कामांसाठी वृक्षसंपदेचा सर्रास बळी दिला जातो. घरांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. व्यावसायिक इमारती उभ्या करायच्या असोत किंवा खासगी इमले बांधायचे असो, झाडांची कत्तल होतेच.
आशियाई देशांना धडा
दक्षिण आशियाई देशांसाठी ही आग महत्त्वाचा धडा मानला जात आहे. विशेषतः भारत, श्रीलंका, भूटान या देशात मोठ्या प्रमाणात जंगले असून, ती वाचविण्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविले जात आहेत. हवामान बदलाबाबतचा पॅरिस करार आणि शाश्वत विकाय ध्येय साध्य करण्यासाठी हे देश वचनबद्ध आहेत. आपण यातून काय बोध घ्यायला हवा? माझ्या माहितीप्रमाणे खालील काही पर्याय भारतासह इतर देशांना फायदेशीर ठरू शकतात. ते पर्याय आपण जाणून घेऊया.
१) मोठ्या प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येला खाऊ घालण्यासाठी अन्नधान्य पिकवायला जंगले तोडायची किंवा तण जाळण्याची गरज नाही. अन्नाची नासाडी होऊ न देणे हा सोपा पर्याय आहे. जेणेकरून सध्या उत्पादित होणारे अन्नधान्य वाढत्या लोकसंख्येला पुरेल. अन्न आणि शेती संघटनेच्या (FAO) माहितीनुसार उत्पादित अन्नधान्यापैकी ३० टक्के अन्नाची नासाडी होते.
२) वाढत्या अन्नाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर निकृष्ट जमिनी सुपीक करण्यासाठी धोरणे आणि साधने असणे आवश्यक आहे. वाळवंटीकरणविरुद्ध लढण्यासाठी झालेल्या एका संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारताचे तत्कालीन पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतातील ५ दशलक्ष हेक्टर निकृष्ट जमिनीला लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट्य ठेवले होते.
३) जंगलातील जमिनींचे मालकी हक्क स्थानिक आणि आदिवासी समाजाकडेच राहू द्यावेत. सरकारने मालकी हक्काचे कायदे कठोर पद्धतीने लागू करण्याची गरज आहे. आदिवासी समाज जंगलाचे मूळ आणि शाश्वत रक्षक आहेत. भारतीय वन कायद्यात या तरतुदीचा समावेश असून त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
४) विकासाच्या मार्गात जंगले कधीही अडथळा असू शकत नाहीत, हे धोरण कठोरपणे प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. जंगले ही लोकांच्या आरोग्यासाठी शाश्वत संपत्ती आहे. खाणींच्या खोदकामांना केवळ जंगले नसलेल्या जमिनींवर प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
५) वृक्षलागवड आणि त्याचे संवर्धन करण्याची हमी मिळाली तरच, लाकडांची उत्पादने (फर्निचर) बनविण्यासाठी झाडे तोडण्याची परवानगी दिली जावी.
६) भारतात शेतात पिकांची कापणी झाल्यानंतर तण जाळण्याची परंपरा आहे. परंतु तण जाळल्याने मोठ्या प्रमाणात धूर होऊ प्रदूषण वाढून पर्यावरणाची हानी होते. या दुष्परिणामाबाबत शेतकर्यांमध्ये जागृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविणे आवश्यक आहे. त्याच गोष्टी नैसर्गित खत म्हणूनही वापरल्या जाऊ शकतात. परिणामी लागवडीसाठी लागणारा खर्च कमी होऊन शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. यामुळे हवा प्रदूषण घटून जंगलांना किंवा शेतांना आग लागण्याच्या घटना कमी होतील. राजकीय नेत्यांनी शेतातील तण जाळण्यापासून शेतकर्यांना रोखण्यासाठी प्लॅस्टिकप्रमाणेच मोठी मोहीम राबविणे आवश्यक आहे.
७) संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत हरित अर्थव्यवस्था कार्यान्वित केली आहे. निसर्गाने पर्यावरणाला ते मूल्य प्रदान केलेले आहे. युनेपेच्या आकडेवारीनुसार अॅमेझॉन वर्षावनांनी पर्यावरण सेवेचे वार्षिक मूल्य साधारण १३ अब्ज डॉलर आहे. हरित अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाच्या मूल्याबाबत भारतातील राजकीय नेते आणि युवकांना शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी Amazon.com या कंपनीच्या माध्यमातून जेफ बेझोस यांनी २५ वर्षांत १३० अब्ज अमेरिकी डॉलर संपत्ती कमावून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. अॅमेझॉनची वर्षावने हीच संपत्ती पर्यावरणाच्या सेवेतून फक्त दहा वर्षांत कमावून देते. पर्यावरणाला ओळखून त्याचा आदर केला, तरच जंगलाला लागणार्या आगीच्या घटना इतिहासात जमा होतील.
Leave a Reply