छायाचित्र : रामकृष्ण मिशन , नवी दिल्ली (wikimedia commons)
वैश्विक महासत्ता किंवा विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. त्यादृष्टीने भारताची वाटचाल सुरू आहे. या साऱ्यात भारतीय तरुणांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर हवामान बदलाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठीही भारतीय तरुणाईच संपूर्ण जगासाठी आदर्श आणि कारणीभूत ठरणार आहे. आजच्या युवा दिनानिमित्त हा विशेष लेख…
सळसळते चैतन्य आणि तरुणाईचे आदर्श असलेल्या स्वामी विवेकानंदांचा आज जन्मदिन. म्हणूनच १२ जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय युवा शक्ती नेमकी काय आहे, तिच्या क्षमता काय आहेत हा खरं तर जगभरातच चर्चेचा विषय ठरतो. त्याला कारणेही तशीच आहेत. आज जगभरामध्ये सर्वाधिक नावाजलेल्या कंपन्यांवर एक नजर टाकूया. सुंदर पिचाई (गुगल), नील मोहन (युट्यूब), सत्या नडेला (मायक्रोसॉफ्ट), अरविंद कृष्णा (आयबीएम), अजय बांगा (वर्ल्ड बँक ग्रुप) शंतनू नारायणन (अडोबे), अंजली सूद (विमेओ), राज सुब्रमण्यम (फेडेक्स), लक्ष्मण नरसिंहन (स्टारबक्स), निकेश अरोरा (पालो अल्टो), थॉमस कुरिअन (गुगल क्लाऊड), विवेक संकरन (अलबर्टसन्स), जॉर्ज कुरिअन (नेटअप), जयश्री उल्लाल (अरिस्ता नेटवर्क्स), वसंत नरसिंहन (नेवार्तिस), संजय मेहरोत्रा (मायक्रॉन टेक्नॉलॉजीज), विमल कपूर (हनीवेल), रेवथी अद्वैथी (फ्लेक्स), निरज शाह (वायफेअर), लीना नायर (चॅनेल), रवी कुमार एस (कॉग्निझंट), रेश्मा केवलरामाणी (व्हर्टेक्स फार्मास्युटीकल्स). म्हणजेच, आज जगभरात ज्या कंपन्यांचा दबदबा आहे आणि ज्या कंपन्यांची उलाढाल अब्जावधीत आहे, त्या कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तींकडेच आहे. यातील बहुतांश तरुण आहेत. भारतीय तरुण आणि त्यांच्यातील टॅलेंट हे आता सर्व विश्वाला चांगलेच ठाऊक झाले आहे.
भारताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, लोकसंख्या. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा हा देश आहे. यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. म्हणजेच, भारत हा तरुणांचा देश आहे. जगाच्या तुलनेत भारताचे सरासरी आयुर्मान हे ३० वर्षे असे आहे. परिणामी, युवा शक्ती हा एक मोठा स्त्रोत आहे. याच्याच जोरावर आपण पाहिले तर असे लक्षात येईल की, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप हे भारतात आहेत. केवळ एवढेच नाही तर ज्या स्टार्टअपची उलाढाल १०० कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे अशांमध्येही भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. ही बाब केवळ भूषणावहच नाही तर भारतीय युवा शक्तीचे प्रतिबिंब दर्शविणारी आहे. आजच्या अत्याधुनिक काळाचे अपत्य आणि आगामी काळात ज्याचा बोलबाला असणार आहे अशा चॅटजीपीटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), ऑगमेंटेड रिअलिटी अशा विविध क्षेत्रातही भारतीय तरुणांचाच बोलबाला आहे.
दोन वर्षांपूर्वी (२०२२मध्ये) एक मोठी आणि ऐतिहासिक घटना घडली. ती म्हणजे, झपाट्याने वाढत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने चक्क ब्रिटनला मागे टाकले. आणि भारत आता जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये जाऊन पोहचला आहे. ज्या ब्रिटनने भारतावर दीडशे वर्षे राज्य केले, भारतीयांचा अनन्वित छळ केला, भारताला लुटले, भारताची आतोनात वाताहत केली, त्याच ब्रिटनला आपण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर आर्थिक क्षेत्रात मागे टाकले. २०३० पर्यंत भारत हा जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्यादृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. या वाटचालीतही तरुणांचेच योगदान अतिशय मोठे आणि महत्त्वाचे आहे.
जगभरात लोकप्रिय असलेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वक्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, भारतात केवळ ४ जाती आहेत. एक म्हणजे युवा, दुसरी म्हणजे नारी, तिसरा शेतकरी आणि चौथा गरीब माणूस. मात्र, शेवटच्या तिन्ही जातींचा विकास करायचा असेल तर त्याची क्षमता पहिल्या जातीमध्ये अर्थात तरुणांमध्ये आहे. भारतीय तरुणाईकडे कल्पकता आहे, सर्जनशीलता आहे, नाविन्याचा ध्यास आहे, क्षमता आहे आणि धडपडही. त्यामुळेच केवळ उद्योगच नाही तर विविध क्षेत्रात भारतीय तरुण हे नेतृत्व करताना दिसत आहेत. तसेच, आज आपल्याला केवळ तरुणांचा आवाज नको आहे. त्यांची ऊर्जा, क्षमता आणि कर्तृत्वाला जोड देणारी कृती हवी आहे. ही कृतीच भारताला विश्वगुरू बनवू शकते.
भारतीय युवा शक्तीचा हा स्त्रोत आणि क्षमता ओळखूनच ग्रीन तेर फाऊंडेशनने अतिशय व्यापक स्वरुपाचा एक कार्यक्रम हाती घेतला आहे. नेट झिरो नावाची ही चळवळ संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम (युनेप), भारतीय विद्यापीठे, भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय (एआयसीटीई) यांच्या माध्यमातून राबविली जात आहे. हवामान बदलाचे महासंकट सध्या विश्वावर घोंघावते आहे. मानवी अस्तित्वच या महासंकटामुळे पणाला लागले आहे. या संकटापासून जगाला वाचवायचे असेल तर हरित गृह वायूंचे उत्सर्जन रोखायला हवे, शाश्वत विकासाची वाट धरायला हवी. याच हेतूने नेट झिरो ही मोहिम राबविली जात आहे. भारतातील १००हून अधिक विद्यापीठे, शेकडो कॉलेजेस आणि लाखो तरुणांच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा राजमार्ग प्रशस्त करण्यात आला आहे. विद्यापीठेही नवसंकल्पना आणि हरित परिवर्तन (ग्रीन ट्रान्सफॉर्मेशन) यासाठी अतिशय प्रभावी केंद्र आहेत. विद्यापीठांमधील या तरुणाईमुळे भारत हा हवामान बदलाच्या संकटातही संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा, प्रेरणा देणारा आणि मैलाचा दगड ठरेल. या वैश्विक कार्यात मी आणि माझी संस्था ही अतिशय मोलाचे योगदान देत असल्याने आज युवा दिनी मला अतिशय आनंद होत आहे. ज्या तरुणाईने जगाला वेड लावले त्याच तरुणाईला नवी दिशा देण्याची आणि त्यांच्या माध्यमातून वैश्विक कार्य घडवून आणण्याचे मोठे कार्य घडते आहे. येत्या काळात त्याचा प्रत्यय केवळ भारताला नाही तर जगालाच येईल. अमेरिकेत जाऊन संपूर्ण जगालाच आरसा दाखविणाऱ्या स्वामी विवेकानंदांना हेच तर अभिप्रेत होते. नाही का?
(शब्दांकन : भावेश ब्राह्मणकर)
Leave a Reply