११ फेब्रुवारी हा दिवस जगभरात वेगळ्या कारणासाठी साजरा केला जातो. तो म्हणजे विज्ञान क्षेत्रातील महिला आणि मुली यांचे योगदान. पर्यावरण आणि हवामान बदल हे विज्ञानाशी निगडीत आहेत. आणि या क्षेत्रातही कार्यरत असलेल्या महिला व मुलींचे प्रमाण मोठे आहे. याविषयावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख…
—
डॉ. राजेंद्र शेंडे
स्विडीश संसदेच्या बाहेर सत्याग्रह करणारी ग्रेटा थनबर्ग ही मुलगी असो की भारतातील चिपको आंदोलनात वृक्षांना मिठी मारुन आंदोलन करणाऱ्या ग्रामीण महिला. पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला व मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातच गेल्या काही दशकांपासून आपण हवामान बदलाच्या वैश्विक संकटाविषयी जागरुक झालो आहोत. त्याविषयी खुप चिंता व्यक्त करतो. पण, यासंदर्भात आवश्यक ती कृती करण्यात आणि ती व्हावी यासाठी महिला व मुली यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. भारतासह जगभरात आपण नजर टाकली की आपल्याला ते लख्खपणे दिसते. ११ फेब्रुवारीच्या निमित्ताने महिला आणि मुलींच्या या योगदानाबद्दल आपण त्यांना सलामच करायला हवा.
भारतीय महिलांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या अत्यंत संयमी आणि सतत कार्यरत असतात. कुटुंबाचा प्रमुख आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वाढत्या पर्यावरणीय समस्यांमुळे आपण रिसायकल, रिड्यूस, रियूज या संकल्पनांबाबत बोलतो. मात्र, भारतीय महिलांची जीवनशैली ही पूर्वीपासूनच निसर्गस्नेही आहे. मोठ्या मुलांचे कपडे लहान मुलांना घालायला देणे असो की घरातील कापडाचे तुकडे आणि चिंध्यांपासून गोधडी शिवणे. या सर्व कृती खुपच बोलक्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर ही सुद्धा भारतीय महिलांची खासियत आहे. भारतीय महिला या तीन पातळ्यांवर मला कार्यरत दिसतात. त्या म्हणजे, प्रत्यक्ष संघर्ष करणाऱ्या, धोरणात्मक कार्य करणाऱ्या आणि थेट कृतीसाठी आग्रही असणाऱ्या.
अहमदनगर जिल्ह्यातील राहिबाई पोपेरे ही महिला गेल्या काही वर्षांपासून देशात चर्चेमध्ये आहे. तसं पाहिलं तर आदिवासी भागातील ही एक सर्वसाधारण महिला. पण, तिने तिच्या कर्तृत्वातून खुप मोठा संदेश दिला. आदिवासी आणि ग्रामीण भागात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी कृषी वाणे असतात. याच वाणांच्या बियाण्यांचे जतन व्हावे यासाठी या महिलेने पुढाकार घेतला. आणि पाहता पाहता या महिलेने बियाण्यांची बँकच तयार केली. आज या पुढाकारामुळे त्यांच्या घरी अतिशय जुन्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा कृषी वाणांचे जतन होत आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात ही बाब अतुलनीय अशीच आहे. रसायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापराने कृषी क्षेत्रावरही मोठे संकट आले आहे. अशा परिस्थितीत सेंद्रीय आणि जुन्या बियाण्यांची ही बँक वरदान ठरावी अशीच आहे.
हवामान बदलाच्या संकटामुळे तुम्ही आमच्या पिढीसमोर किती मोठी आव्हाने निर्माण केली आहेत, असा प्रश्न विचारुन जगाचे लक्ष वेधणारी ग्रेटा थनबर्ग ही चिमुरडी किंवा प्लास्टिकला बाय बाय करण्यासाठीच्या मोहिमेच्या जनक आणि इंडोनेशियातील बाली या बेटावरुन प्लास्टिकला हद्दपार करणाऱ्या इसाबेल आणि मेलाटी या बहिणी. सांगायचे हेच की लहान मुलीही पर्यावरणाच्या क्षेत्रात कुठेही कमी नाहीत. जो तो आपापल्या परीने पूर्ण ताकदिनीशी कार्य करतो आहे. त्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली जात आहे. पर्यावरण हा मानवी जिवनाशी अत्यंत निगडीत आणि जिव्हाळ्याचा आहे. तसे पाहता मानव हा पर्यावरणाचाच एक घटक आहे. आपल्या आजूबाजूचेच नाही तर जगाचेच पर्यावरण धोक्यात आल्याचे कळून चुकल्यानंतर त्याविषयी आवाज उठवणे आणि त्यासाठी आवश्यक ती ठोस कृती करण्यासाठी अनेक चिमुरडींनी आपले योगदान दिले आहे.
अतिशय धाडसी भारतीय पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांची ओळख आहे. त्यांच्यामुळेच आज जगभरात वाघांचे अस्तित्व शिल्लक आहे. कारण, त्यांच्या नेतृत्वातच प्रोजेक्ट टायगरचा प्रारंभ करण्यात आला. याद्वारेच वाघांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्यात आली. गेल्या वर्षीच्या गणनेनुसार भारतात ३६८२ वाघ आहेत. म्हणजेच जगातील तब्बल ७० टक्के वाघ हे भारतात आहेत. व्याघ्र प्रकल्पांमुळे केवळ वाघांचेच संरक्षण झाले नाही तर ती जंगलेही अबाधित राहिली. त्यात वाढ झाली. वाघांचे अस्तित्व असल्यामुळे त्या जंगलांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी झाला. परिणामी, त्या जंगलातील मौल्यवान अशा जैविक विविधतेचेही संरक्षण झाले आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
वंदना शिवा यांनी सेंद्रीय शेती आणि कृषी वाणांसाठी अतिशय वाखाणण्याजोगे काम केले आहे. धान्याच्या गांधी म्हणून त्यांना ओळखले जाते. कर्नाटकातील तुलसी गौडा या महिलेने तब्बल ४० हजाराहून अधिक झाडांचे संगोपन केले आहे. पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. भारतात स्त्रिया या प्रदीर्घ काळापासून पारंपारिक ज्ञान आणि निसर्गाशी सुसंवाद वाढवणाऱ्या प्रथांच्या संरक्षक आहेत. सेंद्रिय शेती तंत्र वापरण्यापासून ते पारंपारिक बियाणे-बचत पद्धतींद्वारे जैवविविधता जतन करण्यापर्यंत, त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे शहाणपण पुढे नेले आहे. जुन्या चालीरीती आणि आधुनिक आव्हाने यांच्यातील अंतर कमी करून, या स्त्रिया सांस्कृतिक वारशासह टिकाऊपणाचे मिश्रण करणारे मॉडेल सादर करतात.
विविध पर्यावरणीय उपक्रमांचे नेतृत्व करण्यातही भारतीय महिला आघाडीवर आहेत. कचरा व्यवस्थापन, वनीकरण आणि अक्षय ऊर्जा यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तळागाळातील संस्था स्थापन करण्यापासून ते स्वच्छ पाणी आणि स्वच्छता यामध्ये त्या इको-वॉरियर्सच्या रुपात दिसतात.
लेडी टारझन अशी ओळख असलेल्या झारखंडच्या चामी मूर्मू या आदिवासी महिलेला यंदा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तब्बल ३० लाखाहून अधिक झाडे लावणाऱ्या मूर्मू यांनी अतुलनीय असे कार्य केले आहे. त्याशिवाय यंदाच्या पद्मश्री पुरस्कारांमध्ये आणखी काही व्यक्तींचा समावेश आहे. आसाममधील पारबती बरुआ या पहिल्या महिला माहूत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षात त्यांचे योगदान मोठे आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या के चेलाम्मल या महिलेचे कर्तृत्वही वाखाणण्याजोगे आहे. ही झाली काही भारतीय नावे.
पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची यशकथा टाइम मासिकाने प्रसिद्ध केली. यानिमित्ताने पुन्हा एकदा जगभरात या महिलांविषयी मोठी चर्चा झाली. हवामान बदलाचा मोठा फटका जगाच्या विविध भागांना बसणार आहे. (खरं तर सध्याही आपण त्याचा अनुभव घेत आहोत). पण, या नैसर्गिक संकटाचा मोठा परिणाम मुली आणि महिलांवर होतो. कारण, कुटुंब सांभाळण्याची मोठी जबाबदारी महिलांवर आहे. आपल्याकडचेच उदाहरण घेऊया ग्रामीण आणि दुर्गम भागात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे महिला व मुलींनाच पायपीट करावे लागते. तर, ज्या भागात नैसर्गिक आपत्तींची मालिका सतत सुरू असते तेथून स्थलांतराचे प्रमाण वाढते. याच स्थलांतरीतांमध्ये महिला व मुलींचे प्रमाण मोठे आहे. हवामान निर्वासित (क्लायमेट रिफ्युजी) हा शब्द सध्या परवलीचा झाला आहे. युरोपीय देशांमध्ये या निर्वासितांचा प्रश्न फार मोठा आहे. या निर्वासितांना अनेकानेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
जागतिक तपमान वाढीमुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. यामुळे अनेक बेटे ही पाण्याखाली जातील अशी भीती आहे. तसे झाले तर त्या बेटांवरील नागरिक हे सहाजिकच सुरक्षित ठिकाणी स्थलांतराला प्राधान्य देतील. म्हणजेच हे सर्व जण निर्वासितच असतील. त्यांची संख्या लाखोच्या घरात असणार आहे. उदाहरणार्थ भारतीय महासागरातील मालदीव, श्रीलंका किंवा अन्य लहान बेटांवरील नागरिक हे भारत किंवा तत्सम देशांमध्ये स्थलांतर करण्याला प्राधान्य देतील. म्हणजेच भारतासह अन्य देशांमध्ये तेव्हा आणखीही काही प्रश्न निर्माण होतील. सद्यस्थितीत बांगलादेश किंवा म्यानमारमधून भारतात अवैधपणे नागरिक येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अखेर या भागातील सीमेवर तारेचे कुंपण घालण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. हवामान बदलाच्या समस्येकडे आपण गांभिर्याने पाहिले नाही आणि हरित गृह वायूंचे उत्सर्जन रोखण्यासाठी ठोस कृती केली नाही तर नजिकच्या काळातच आपल्यामागे अनेक अक्राळविक्राळ समस्यांचा ससेमिरा लागणार आहे.
भारतीय स्त्रिया शाश्वत जीवनासाठी आग्रही आहेत. शिवाय जगासमोर एक उल्लेखनीय उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी विलक्षण समर्पण आणि उत्कटतेचे प्रदर्शन करत आहेत. पारंपारिक शहाणपणाचा उपयोग करणे, पर्यावरणासंबंधी पुढाकार घेणे, शाश्वत व्यवसायांना चालना देणे, नवीकरणीय ऊर्जेला चालना देणे, धोरणातील बदलांचा पुरस्कार करणे आणि भावी पिढ्यांचे सक्षमीकरण करणे या सर्वच पातळ्यांवर त्या अग्रेसर आहेत. समाजात सकारात्मक बदलासाठी भारतीय महिला उत्प्रेरक बनले आहेत.
महिला आणि मुलींच्या योगदानातून आपण सर्वांनीच मोठा धडा घ्यायला हवा. विज्ञान-तंत्रज्ञान-पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. विविध देशातील समाजाने (कम्युनिटी) आता एकत्र येण्याची आणि शाश्वत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. जगभरात प्रसिद्ध होणारे विविध अहवाल धडकी भरवत आहेत. मानवी आयुष्यच पणाला लागले असल्यामुळे सर्वांनीच एकजुटीने हवामान बदलाच्या संकटाचा सामना करणे आवश्यक आहे. तसे नक्की घडेल, असे मला वाटते. कारण, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जसा स्त्रीचा सहभाग असतो तसाच प्रत्येक यशस्वी समाजामागे महिला असते.
Leave a Reply