विकास साधायचा आहे पण कसा?

लिड – जागतिक जीवघेण्या स्पर्धेमुळे माणसाने मनमानी करत पर्यावरणाचा कोणताही विचार न करता फक्त विकाससाधण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या पर्यावरणाची हानी भरून काढता येणार नाही, असे लक्षात आल्यामुळे शाश्वत विकासाची गरज भासली. शाश्वत विकास म्हणजे काय तर पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशी कृती करणारा विकास साधणे होय. 

संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्व १९३ सदस्य देशांनी सप्टेंबर २०१५ साली शाश्वत विकासाचे ध्येये (SDGs) हा एक महत्त्वाचा जाहीरनामा स्वीकारला आहे. यामध्ये गरिबी, भूक, महिलांविरोधातील हिंसा रोखण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. प्रत्येकाला समान न्याय मिळावा यावरही या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. २०१५ ते २०३० या काळात संकल्पित विकास घडवून आणण्याचा निर्धार या देशांनी केला आहे. 

ती ध्येये कोणती?जागतिक संघटनेने ठरविलेली ध्येये पुढीलप्रमाणे ः १) दारिद्रय निर्मुलन, २) भूक निर्मूलन, ३) चांगले आरोग्य, ४) दर्जेदार शिक्षण, ५) लैंगिक समानता, ६) शुद्ध पाणी आणि स्वच्छता, ७) स्वस्त ऊर्जा, ८) चांगल्या नोकर्या आणि अर्थशास्त्र, ९) नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा, १०) असमानता कमी करणे, ११) शाश्वत शहरे आणि समाज, १२) उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्ण वापर, १३) हवामानाचा परिणाम, १४) शाश्वत महासागर, १५) जमिनीचा शाश्वत वापर, १६) शांतता आणि न्याय, १७) शाश्वत विकासासाठी भागिदारी.

उपरोक्त ध्येयांप्रमाणे शाश्वत विकास केल्याशिवाय समस्त मानव जातीचे कल्याण होऊ शकणार नाही. जागतिक विकासाची ध्येये ठरवून ती साध्य करण्यासाठीची पावले टाकणे महत्त्वाचे आहे. ज्या देशांना शाश्वत विकासाचे गमक समजले आहे, त्यांनी या ध्येयांकडे पावले टाकण्याच सुरुवात केली आहे. ही ध्येये सर्वांनाच बंधनकारक नसल्यामुळे प्रत्येक देश पूर्ण प्रयत्न करेलच असे नाही. त्यासाठी प्रत्येक देशाने सहकार्य करणे गरजेचे आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत ही ध्येये पूर्ण करण्यासाठी घडाळ्याचे काटे वेगाने पुढे सरकत आहेत.    

शाश्वत विकासाचे ध्येयाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी या प्रक्रियेला कोण गती देणार? ४ जून २०२० रोजी झालेल्या एका कार्यक्रमात “एसडीजी-कोविड-१९ ः विद्यापीठे पासा पलटवू शकतात”, हा माझ्या मुख्य भाषणाचा विषय होता. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक नेत्यांची सप्टेंबर २०१९ मध्ये न्यूयॉर्कमध्ये परिषद झाली. त्याच वर्षी चार महिन्यांपूर्वी जगभरात वाढलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त करून “शाश्वत विकासासाठी दशकाची कृती आणि वितरणाची तयारी” या विषयावर चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस (UNSG) अँटिनिओ गुटेरेस नुकतेच म्हणाले की, आपण अशा जगात वावरत आहोत, जिथे जास्तीत जास्त आव्हाने एकत्रितरित्या येत आहेत. पण आपले प्रतिसाद शून्य आहेत. संयुक्त राष्ट्र सरचिटणीस गुटेरेस यांनी प्रतिपादीत केलेले मुद्दे मी माझ्या भाषणात सविस्तर मांडले. मी म्हणालो होतो, एसडीजीसाठी आपले प्रतिसाद निश्चितच शून्य आहेत. पण एक शक्ती आहे जी या प्रतिसादाला नक्कीच एकत्र करू शकते. ती म्हणजे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी.

एसडीजीच्या जागतिक प्रगतीबाबत संयुक्त राष्ट्राच्या २०१९ च्या अहवालातून काही निष्कर्ष निघत आहे. आपल्याला अधिक वेगाने आणि अधिक महत्त्वाकांक्षी प्रतिसाद आवश्यक आहे. २०३० चे आपले ध्येय साध्य करण्यासाठी जगाने सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडविले पाहिजे. उद्याची धोरणे तयार करणारी तरुण पिढी हे परिवर्तन घडवू शकणार आहे. जगावरकोविड-१९ च्या प्रचंड हल्ल्यामुळे आपण काही वर्षे मागे गेलो आहोत. एसडीजीवर मोठा आघात झाला आहे. आता आपल्याला काय करायचे आहे? एसडीजी लागू करण्यासाठी नऊ वर्षांचा कालावधी राहिलेला असताना आपण ते अर्धवट सोडून द्यायला हवे का? सीडीजीचे स्वप्न दूरच राहणार का? हे प्रश्ने अनुत्तरितच आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *